दिवाळी फराळाने पोलिस सुस्त, वाळूजमध्ये हजारोंचे डल्ले मारून चोरटे मस्त

Foto

औरंगाबाद – दिवाळीपासून औरंगाबादमध्ये सुरु असलेला चोरीचा सिलसिला काही थांबायचे नाव घेत नाही. वाळूज पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या तुर्काबाद खराडी येथील किराणा दुकान  फोडल्याच्या घटनेला चोवीस तासही उलटले नाही तर, पुन्हा एकदा चोरट्यांनी याच भागात धुमाकूळ घातला आहे. वाळूज येथील कामळापूर रोडवरील दोन मेडीकल दुकानांचे शटर उचकटून चोरांनी रोख राकमेसह 30 हजारांच्या मालावर डल्ला मारला आहे. वाळूज परिसरात चोरीच्या सलग तीन घटना घडल्याने व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दिवाळीच्या फराळाने पोलिस सुस्तावले की काय, ज्यामुळे चोर रहदारीच्या रस्त्यावरील दुकाने फोडण्यासही घाबरत नाही, अशी प्रतिक्रिया नांगरिकांमधून व्यक्त होत आहे.  

 

कुठे आणि कोणती दुकाने फोडली

वाळूज परिसरातील कामळापूर रोडवर शरद बोडखे यांचे गुरुकृपा मेडीकल आणि या दुकानाच्या काही अंतरावर असलेले बंडू अमके यांचे विजय मेडीकल या दोन्ही औषधी दुकानांना चोरट्यांनी लक्ष केले. रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी या दोन्ही मेडीकलचे शटर उचकटून गल्ल्यामधील रोख रकमेसह औषधी, सौंदर्य प्रसाधने यावर डल्ला मारला.

 

शरद बोडखे आणि बंडू अमके हे रविवारी रात्री नेहमीप्रमाणे दुकाने बंद करुन गेले होते. रात्री ३ वाजता त्यांना नागरिकांनी फोन करुन दुकानाचे शटर उचकटल्याची माहिती दिली. त्यांनी दुकानाकडे धाव घेतली आणि पाहाणी केली असता गुरुकृपा मेडीकलमील ११ हजार रुपये रोख आणि पाच हजार रुपयांचे साहित्य लंपास झाले होते. त्यांच्या शेजारी असलेल्या बंडू अमके यांच्या दुकानातून १० हजार रुपये रोख आणि पाच हजारांच्या साहित्यावर चोरट्यांनी डल्ला मारला होता. दोन्ही दुकानांतील सुमारे ३१ हजारांचा माल चोरीला गेला आहे.

 

चोरीच्या घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. सोमवारी सकाळपर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. वाळूज परिसरात सलग तीन दुकानांना चोरट्यानी लक्ष केल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांची रात्रीची  गस्त वाढविण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे